साहित्य संमेलनातून सामाजिक समता,बधुता व न्याय मिळावा-उद्घाटक रामदास आठवले
शब्द सारस्वतांचे काम जनगणमन सुधारण्याचे-संमेलनाध्यक्ष डॉ.अमोल बागुल
पुणे दि.४(प्रतिनिधी )
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे आयोजित ३रे अखिल भारतीय मा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्य ऑनलाईन संमेलन ४ जुलै २०२१ साहित्यिक डॉ.अमोल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.यावेळी उद्घाटक म्हणून रामदास आठवले (केंद्रीय समाज कल्याण मंत्री), पशुसंवर्धन मंत्री तथा आमदार महादेव जानकर(पशुसंवर्धन मंत्री तथा आमदार),अभा मसापचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद गोरे,अभामसापच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर,परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त व साहित्यिक ज्ञानेश्वर पतंगे,रवींद्र पाटील-प्रदेशाध्यक्ष (कर्नाटक),राष्ट्रीय विश्वस्त सुवर्णा पवार,आनंद शेंडे-अध्यक्ष (विदर्भ प्रदेश), राजश्री बोहरा (सुप्रसिद्ध साहित्यिका तथा अध्यक्ष मुंबई प्रदेश) आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
“डॉ आंबेडकर यांच्या माध्यमातून तळागाळातला माणूस जगण्याच्या व्यासपीठावर आज प्रगती करत आहे. राज्यघटनेने सामान्य माणसाला दिलेले अधिकार त्याच्या जगण्याची पातळी वाढवण्यासाठी मदत करत आहेत. परंतु जगण्याची उमेद दाखवणारं साहित्य हेदेखील सारस्वतांकडून येणे अपेक्षित आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून असलेल्या साहित्यकृती या अजरामर ठरतात.साहित्य संमेलनातून सामाजिक समता,बधुता व न्याय मिळावा,विषमतेचे दरी नष्ट व्हावी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,अशाच निर्मितीतून समाज स्वातंत्र्य,समता व बंधुता यांच्या दिशेने वाटचाल करतो”असे प्रतिपादन या साहित्य संमेलनाचे उद्घाटक तथा केंद्रीय समाजकल्याण मंत्री श्री रामदास आठवले यांनी केले.
संमेलनाध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ बागुल यांनी विशद केले की,”साहित्य संमेलन ही वैचारीक बैठक असुन समाजमनाला उभारी देणारी असतात.साहित्य संमेलन हे उपेक्षितांना जगण्याचं बळ देत असते. गेल्या दोन दशकांपासून साहित्यकृतीतून जिवंत माणूस सापडेनासा झाला आहे. कवी- लेखक- साहित्यिकांची वास्तवतेजवळ जाण्याची उर्मी कमी झाली असून येत्या आधुनिक काळामध्ये साहित्यिकांनी कागदावर बागडण्यापेक्षा समाजात साहित्याच्या माध्यमातून सक्रिय होण्याची वेळ आता आलेली आहे. पुरस्कार- सन्मान -मानपान या पलीकडे जाऊन या देशाचे जनगणमन सुधारण्याचे काम आता साहित्यिकांनी खऱ्या अर्थाने हाती घेणे आवश्यक आहे.माणसाचे सामाजिक बांधकाम हे साहित्यिकांच्या हाती आहे.”
यावेळी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे स्वागताध्यक्ष म्हणून स्वागत करून” छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्शवादी युग पुरुष असुन सामाजिक विषमतेची तौलनिक वैचारिक मांडणी विशद केली. समाज घडवताना समाजाला विचार देणे आवश्यक असते,हाच विचार देण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून फुले-शाहू-आंबेडकर चळवळीने केले. साहित्यिक कुठल्याही जाती धर्माचा असो फक्त उभा माणूस घडविणे एवढेच त्याचे आद्यकर्तव्य असावे. भारत घडवणाऱ्या धुरिणांनी स्वतःचे घरदार सोडून हे शिवधनुष्य पेलले. प्रत्येक साहित्यिकाने दररोज एक माणूस शहाणा करून सोडावा,एवढे जरी केले तरी माणुसकीचा आलेख उंचावण्यास मदत होणार आहे.”असे विशद केले
“उपेक्षित वंचिताना हक्क साहित्यातून मांडून न्याय मिळेल.गोरगरीब वंचितांसाठी काम करणारी पिढी पुढे येणे गरजेचे आहे. अन्न -वस्त्र -निवारा या मूलभूत गरजांबरोबरच माणसाची प्रगती होताना आचार आणि विचार हे असल्याशिवाय त्याला त्याच्या संवेदनांची जाणीव होणार नाही. हाच विचारांचा खजिना देण्याचे काम अभामसाप करीत आहे. महाराष्ट्राच्या सर्वदूर भागातून एकत्र आलेल्या होतकरू साहित्यिकांची अभामसाप ही संघटना जगभर गेल्याशिवाय राहणार नाही तसेच परिषदेच्या माध्यमातून शरद गोरे यांचे कार्य प्रेरणादायी असून साहित्य कोट्यातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदारपद मिळालं पाहिजे”असे प्रतिपादन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
स्वागत रविंद्र पाटील यांनी तर प्रास्ताविक आनंद शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजकुमार काळभोर यांना साहित्यक्षेत्रातील हॅलो योगदानाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सुत्रसंचालन मुंबई प्रदेश अध्यक्ष राजश्री बोहरा यांनी केले.स्मार्ट इंटेलिजंट आर्टिस्ट विराज म्याना याने तंत्रज्ञ बाजू सांभाळली.आभार मानसी पाटील यांनी मानले.
उद्घाटन सोहळ्यानंतर रंगलेल्या जम्बो कवी संमेलनामध्ये शंभरहून अधिक कवींनी सहभाग घेतला.